पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषदेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १९६.६१ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प नुकताच मंजूर केला. विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात कोणतीही नवीन करवाढ सुचवण्यात आलेली नाही. आर्थिक शिस्त, विकासाभिमुख नियोजन आणि उत्तम नागरी सेवा यांचा त्रिवेणी संगम साधणारा हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विशेष सभेचे आयोजन :
महाराष्ट्र नगर परिषदा अधिनियम १९६५ च्या कलम १०१ ते १०४ नुसार आयोजित विशेष सभेत लोकनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहण मोरे आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या उपस्थितीत या अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभेच्या सुरुवातीला राज्याचे दिवंगत माजी वित्तमंत्री अजितदादा पवार व इतर मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन :
हा अर्थसंकल्प सध्याच्या प्रत्यक्ष उत्पन्नाच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने आवश्यक महसुली खर्च, सुरू असलेले जुने प्रकल्प पूर्ण करणे आणि शहराच्या सुनियोजित विकासासाठी नवीन योजनांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल दीपक महाजन, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरस्कर यांनी हा आराखडा तयार केला, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी त्याचे वाचन केले.
महत्त्वाचे सामाजिक निर्णय :
अर्थसंकल्पाव्यतिरिक्त सर्वसाधारण सभेत १३० विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यात मानवी दृष्टिकोन ठेवून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:
अंत्यविधी साहित्य: मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या व इतर साहित्य नगर परिषदेमार्फत उपलब्ध करून दिले जाईल.
बेबी किट: शहरात जन्मलेल्या नवजात बालकांसाठी मोफत ‘बेबी किट’ पुरविले जाणार आहे.
स्वर्गरथ व हद्दवाढ: शहरासाठी नवीन ‘स्वर्गरथ’ तयार करणे आणि शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
व्यापारी गाळे: व्यापारी गाळ्यांच्या भाडेवाढ आणि हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींचा दातृत्वपूर्ण निर्णय :
या सभेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, उपस्थित सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी त्यांचा या दिवसाचा ‘मिटिंग भत्ता’ मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी देण्याचा निर्णय घेतला. या संवेदनशील निर्णयाचे शहरभर कौतुक होत आहे.
या प्रसंगी गटनेते, सर्व प्रभाग समिती सभापती, नगरसेवक-नगरसेविका, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, कर निरीक्षक संजय गिते, पाणीपुरवठा अभियंता संकेत कार्ले, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी यांच्यासह पालिकेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. शेवटी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार व नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.



