Home Cities अमळनेर साईड न दिल्याच्या कारणावरून चार जणांकडून कारची तोडफोड

साईड न दिल्याच्या कारणावरून चार जणांकडून कारची तोडफोड

0
107

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाहन चालवत असताना साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून चौघांनी मिळून एका व्यापाऱ्याची कार अडवून तिची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर तालुक्यातील डांगर गावातील बसस्थानकासमोर घडली आहे. या प्रकरणी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील शारदा कॉलनी परिसरात तुषार लालचंद पवार (वय २४) हा तरूण वास्तव्याला आहे. गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तुषार हे त्यांच्या चारचाकी वाहन (क्रमांक एमएच ४४ बी ७००७) ने अमळनेर शहराकडे येत होते. यावेळी डांगर गावातील बसस्थानकासमोर संशयित आरोपी शुभम सुनील पाटील, मुकेश प्रकाश सोनवणे, सुनील धुडकू पाटील आणि धिरज सुनील पाटील (सर्व रा. डोंगर, ता. अमळनेर) यांनी त्यांचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्यात आडवा लावून तुषारची कार अडवली.

वाहन चालवताना साईड का दिली नाही, या कारणावरून संशयितांनी तुषारला अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कारच्या बोनेटवर दगड मारून नुकसान केले आणि ट्रॅक्टरने कारला धडक देऊन मोठे नुकसान केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी तुषार पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांनी शुभम पाटील, मुकेश सोनवणे, सुनील पाटील आणि धिरज पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound