जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केटरिंग व्यवसायाशी संबंधित हजारो कामगारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खानदेश केटरिंग असोसिएशनने कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि कामाचे तास यांचा विचार करून रात्री १२ वाजेनंतर केटरिंग सेवा बंद करण्याचा प्रस्ताव मांडला असून, या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे केटरिंग क्षेत्रात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
असोसिएशनच्या माहितीनुसार, सध्या विवाह सोहळे, वाढदिवस, रिसेप्शन आणि इतर समारंभ रात्री उशिरापर्यंत म्हणजेच पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत सुरू राहतात. या कार्यक्रमांमुळे केटरिंग कर्मचाऱ्यांना सलग अनेक तास काम करावे लागते. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा कामावर हजर राहण्याची वेळ येते. या सततच्या धकाधकीमुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

अपुऱ्या झोपेमुळे थकवा, मानसिक ताण आणि शारीरिक समस्या वाढत आहेत. तसेच रात्री उशिरा घरी परतताना अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही निदर्शनास आले आहे. जळगाव जिल्ह्यातील केटरिंग व्यवसायावर सुमारे २० हजारांहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर ठरत असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याची गरज असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
या प्रस्तावाबाबत असोसिएशनची भूमिका स्पष्ट असून, आगामी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याबाबतचा औपचारिक ठराव पारित केला जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, जळगाव शहराध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, कोषाध्यक्ष गोपाल व्यास, मुख्य सल्लागार राजेंद्र वैष्णव आदींनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली.



