जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याच्या सनसनाटी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पीडित महिलेचा पतीच असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याने पोटगीचा सूड घेण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी देऊन हे कृत्य घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एका आरोपीला अटक केली असून, त्यांच्याकडून ९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
फिर्यादी किरण उमेश राऊळ आणि त्यांची आई नगरदेवळा येथील घरी झोपलेल्या असताना, दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.

तपासातील धक्कादायक खुलासा :
एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा फिर्यादीचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. राहुल पाटील आणि त्याची पत्नी किरण राऊळ यांच्यात न्यायालयात वाद सुरू असून, कोर्टाने राहुलला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या पोटगीचा राग मनात धरून राहुलने पत्नीला धडा शिकवण्यासाठी २ लाखांची सुपारी दिली आणि १ लाख रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) दिले होते.
आंतरराज्य दुचाकी चोऱ्यांचे गुन्हे उघड :
आरोपी गणेश पाटील याच्याकडे केलेल्या तपासात त्याने केवळ जाळपोळच नाही, तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोटारसायकली चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी त्याच्याकडून पाचोरा, जळगाव एमआयडीसी, भोकरदन (जालना), शेगाव रेल्वे, बोदवड आणि सुरत (गुजरात) येथील चोरीच्या एकूण ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय शेखर डोमाळे व त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. आरोपींना पुढील तपासासाठी पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.



