जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या निनादात पोलीस कॉलनी व सुप्रीम कॉलनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)च्या नव्या शाखेचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत परिसरातील ५० हून अधिक मुस्लिम तरुणांनी अधिकृतरित्या मनसेत प्रवेश करत पक्षसंघटनाला नवे बळ दिले.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि “राजसाहेब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. या शाखा उद्घाटनामुळे जळगाव शहरात मनसेची ताकद वाढण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, विभाग अध्यक्ष उमेश आठरे, दीपक राठोड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस कॉलनी परिसर शाखाध्यक्षपदी युसुफ जाकीर खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच ‘थ्री इडियट’ फेम जहांगीर पेंटर यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
मनसेत प्रवेश केलेल्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका, विकासाभिमुख विचारसरणी आणि महाराष्ट्राच्या हितासाठीची आक्रमक भूमिका त्यांना भावली आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन राज्याच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पोलीस कॉलनी व सुप्रीम कॉलनी भागात जनसेवा आणि संघटन विस्ताराचे काम अधिक जोमाने करण्याचे आवाहन केले. शाखा सुरू झाल्यामुळे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी मनसेत प्रवेश केलेल्यांमध्ये युसुफ जाकीर खाटीक (शाखाध्यक्ष), बादशाह (उपाध्यक्ष), अशपाक शहा (सचिव), अभिषेक बेंगळे, जहांगीर पेंटर, अली आरिफ खाटीक, दीपक चौधरी, अफजल इसाका खाटीक, इमरान शहा, इम्रान पिंजारी, साहिल सलीम पिंजारी, तौसीब शब्बीर, समीर पिंजारी, स्माईल पटेल, राजू भाई यांच्यासह अनेक तरुणांचा समावेश होता.



