जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जळगाव-जामनेर रस्त्यावरील आर. एल. चौफुली जवळ भाजीपाला वाहून नेणाऱ्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. या अपघातात फिर्यादी आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र दिलीप राठोड (वय २१, रा. शंकरपुरा तांडा, ता. जामनेर) हे आपल्या ताब्यातील भाजीपाल्याने भरलेली बोलेरो मालवाहू गाडी (क्रमांक MH-04-LE-3625) घेऊन १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जामनेरकडून जळगावकडे येत होते. यावेळी गाडीचे चालक हर्षल विरसींग राठोड हे वाहन भरधाव वेगात चालवत होते.

आर. एल. चौफुली जवळ आले असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालकाने अचानक जोरात ब्रेक दाबल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि भाजीपाल्याने भरलेली बोलेरो रस्त्यावरच पलटी झाली. या भीषण अपघातात फिर्यादी जितेंद्र राठोड आणि मंगल सिताराम राठोड हे दोघेही जखमी झाले आहेत.
याप्रकरणी जितेंद्र राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालक हर्षल विरसींग राठोड याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.ना. हेमंत जाधव करत आहेत.



