Home राजकीय उपनगराध्यक्ष आसिफ मोहम्मद यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी मुंबईत भेट

उपनगराध्यक्ष आसिफ मोहम्मद यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी मुंबईत भेट


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहराच्या विकासकामांना चालना देण्यासाठी उपनगराध्यक्ष आसिफ मोहम्मद यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबई येथे भेट घेत नगरपालिकेसाठी विशेष विकासनिधीची मागणी केली आहे. शहरातील प्रलंबित कामे, पायाभूत सुविधा आणि अल्पसंख्याक भागांच्या विकासासाठी निधी मिळावा, यासाठी हा पाठपुरावा करण्यात आला.

मुंबईत नुकत्याच झालेल्या या भेटीत आसिफ मोहम्मद यांनी रावेर नगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडला. शहरातील रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता मोहिमा, गटारी व नागरी सुविधा उभारणीसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यासोबतच अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची विनंतीही त्यांनी केली. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने शहरातील प्रत्येक घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. वाढत्या लोकसंख्येमुळे नगरपालिकेवर ताण वाढत असून शासनाच्या आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती उपनगराध्यक्षांनी दिली. नगरपालिकेकडून सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांचा अभ्यास करून योग्य त्या स्तरावर निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. या भेटीनंतर रावेरमधील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रावेरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे आसिफ मोहम्मद यांनी स्पष्ट केले. नगरपालिकेला अपेक्षित निधी मिळाल्यास शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील आणि नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound