Home Cities जळगाव महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार :...

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार : दीपमाला काळे


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नियोजनात्मक शाश्वत विकास’ हेच आमचे मुख्य ध्येय आहे. विशेषतः महिला व बालकल्याण समिती आणि स्थायी समिती या दोन महत्त्वाच्या स्तंभांच्या माध्यमातून शहरात प्रभावी विकासकामे राबविली जातील, अशी ग्वाही महापौर दीपमाला काळे यांनी दिली आहे.

महानगरपालिकेमध्ये सोमवारी महासभा बोलवण्यात आली होती. या महासभेमध्ये स्थायी समिती व महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी प्रतिक्रिया दिली. शहराच्या भविष्यातील नियोजनाचा आराखडा मांडला. समित्यांचे निवडीमुळे जळगाव शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची आणि महिला-बालकांसाठी विशेष योजना प्रभावीपणे राबवल्या जाण्याची आशा पल्लवित झाली आहे.

नियोजनाचे मुख्य पैलू
महिला सक्षमीकरण: महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कौशल्य विकास योजना, आरोग्य शिबिरे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणार आहेत. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाईल.

पायाभूत सुविधांचा विकास: स्थायी समितीच्या माध्यमातून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन, निधीचा योग्य विनियोग करत दीर्घकालीन विकास साधण्यावर महापौरांनी जोर दिला.
पारदर्शक प्रशासन: विकासकामे करताना ती केवळ तात्पुरती न राहता शाश्वत असावीत, यासाठी नियोजनामध्ये पारदर्शकता आणि तांत्रिक अचूकता पाळली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

“जळगाव शहराला एक आधुनिक आणि सुविधासंपन्न शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिला आणि बालकांचा विकास हा समाजाचा पाया आहे, तर स्थायी समिती हा विकासाचा कणा आहे. या दोन्हीच्या समन्वयातून जळगावचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा मानस आहे.”
दीपमाला काळे, महापौर (जळगाव म.न.पा.)


Protected Content

Play sound