Home Cities जळगाव मनपा स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नावांची घोषणा !

मनपा स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नावांची घोषणा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सदस्य निवडीचा कार्यक्रम सोमवारी, १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या समितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महापौरांनी बंद पाकीटातून १६ सदस्यांची नावे वाचून दाखवली, ज्यामध्ये राजकीय समीकरणांचे विशेष प्रतिबिंब उमटलेले पाहायला मिळाले.

भाजपचे वर्चस्व कायम :
महापालिकेच्या आर्थिक नाड्या ज्या समितीच्या हाती असतात, त्या १६ सदस्यीय स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १६ पैकी १० जागांवर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. यामध्ये अनुभवी नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, विशाल भोळे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे आणि नितीन सपके यांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाचे स्थान :
राजकीय फेरबदलानंतर शिवसेना शिंदे गटानेही समितीत आपले स्थान भक्कम केले असून, त्यांच्या कोट्यातून ५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, विक्रम सोनवणे, सागर सोनवणे आणि नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले असून, त्यांच्याकडून इब्राहिम पटेल यांची एकमेव सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

विकासाच्या कामांना मिळणार गती :
स्थायी समितीचे सदस्य जाहीर झाल्यामुळे आता लवकरच सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महानगरपालिकेतील रखडलेले आर्थिक निर्णय, निविदा प्रक्रिया आणि विकासकामांना या निवडीनंतर वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापौरांनी नावे जाहीर करताच नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.


Protected Content

Play sound