Home क्राईम धक्कादायक : पोटच्या मुलाकडून पित्याची हत्या; पैशांवरून झाला वाद !

धक्कादायक : पोटच्या मुलाकडून पित्याची हत्या; पैशांवरून झाला वाद !


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कौटुंबिक वादातून आणि पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची लाकडी काठीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मानवी नात्याला काळीमा फासण्याचे काम या कृत्याने केले आहे. भिकन रणा मोरे (वय ६८, रा. एम.जे.नगर, चाळीसगाव) असे मृत पित्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा कल्पेश भिकन मोरे याला रिक्षा खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने वडील भिकन मोरे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. वडिलांचा हा नकार कल्पेशला सहन झाला नाही. १४ फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरात याच कारणावरून पुन्हा वाद झाला.

संतापाच्या भरात कल्पेशने घरातील जड लाकडी काठी उचलली आणि आपल्या वडिलांच्या डोक्यावर, तोंडावर आणि पायावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत भिकन मोरे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, परंतु जबर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संशयित आरोपी कल्पेश मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.


Protected Content

Play sound