Home Cities जळगाव बारा ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृताचे सामूहिक पारायण

बारा ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृताचे सामूहिक पारायण

0
121


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जळगाव शहरातील एसटी वर्कशॉप जवळील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आध्यात्मिक उर्जेने आणि शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.

सामूहिक पारायणाने भक्तीचा जागर :
या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘रामकृष्ण हरी ग्रुप’च्या वतीने आयोजित केलेले शिवलीलामृताचे सामूहिक पारायण. अनेक शिवभक्तांनी एकत्र येत शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले. या उपक्रमाबद्दल माहिती देताना मंदिराचे पुजारी योगेश जोशी महाराज यांनी सांगितले की, भाविकांमध्ये आध्यात्मिक जागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हे पारायण उत्साहात पार पडले.

मान्यवरांची उपस्थिती आणि महाआरती :
या मंगल प्रसंगी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर सिमाताई भोळे आणि महापौर दिपमाला काळे यांनी मंदिरात उपस्थित राहून बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक विष्णू भंगाळे, सुनील खडके, विरेन खडके, पियुष कोल्हे, अमित काळे यांच्यासह शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी आणि रांगेचे योग्य नियोजन करण्यात आले होते. बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि सामूहिक पारायणामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound