Home क्राईम ब्रेकींग : जळगावात अग्नितांडव : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे...

ब्रेकींग : जळगावात अग्नितांडव : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या जळगाव भागातील कुढापा चौक परिसरात रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. सकाळी १० वाजेच्या सुमारास एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबांचा संपूर्ण संसार डोळ्यांदेखत भस्मसात झाला आहे.

शॉटसर्कीट नंतर सिलेंडरचा फोट :
मिळालेल्या माहितीनुसार, कुढापा चौक परिसरात निलेश शंकर शिरसाट आणि बापू शंकर शिरसाट यांची घरे आहेत. रविवारी १५ फेब्रुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाले आणि त्यानंतर गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळांनी आजूबाजूच्या घरांनाही कचाट्यात घेतले. दरम्यान लाकडाच्या पार्टीशनच्या घरे असल्याने तीनही घरांना भीषण आग लागली होती.

संसाराची झाली राखरांगोळी :
या भीषण आगीत शिरसाट कुटुंबातील संसारोपयोगी वस्तू, कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. राहत्या घराची काही वेळातच राखरांगोळी झाल्याचे पाहून कुटुंबीयांना आपले अश्रू अनावर झाले होते. आगीची भीषणता पाहून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आग आटोक्याबाहेर होती.

अग्निशमन दलाची कामगिरी :
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे ५ बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि आगीचे स्वरूप पाहता जवानांना सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

नगरसेवकांकडून सांत्वन :
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक पियुष कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि प्रशासकीय मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पीडित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound