चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेतातून केबल वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
दि. २२ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.०० वाजण्याच्या सुमारास चोपडा शहर पोलिस ठाणे हद्दीतील काबरा पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस असलेल्या नरेंद्र रतीलाल धनगर यांच्या शेतातून रिलायव्हल गोल्ड कंपनीच्या बोअरिंग मोटरची अंदाजे १२०० फूट केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामपुरा भागातील स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या भंगार दुकानावर छापा टाकला. येथे चोरी केलेली केबल वायर जाळून त्यातील तांब्याची तार वेगळी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. अनिल बाबुराव रायसिंग (रा. शेतपुरा, चोपडा) याच्या ताब्यातून सुमारे ११ किलो तांब्याची तार तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
दरम्यान, आरोपी अनिल जामसिंग बारेला (रा. कारगील, चोपडा) हा चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. एकूण सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सूचनेनुसार पार पडली. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलिस उपनिरीक्षक चेतन परदेशी, सहायक फौजदार दीपक विसावे, हवालदार संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई, पोलिस शिपाई विनोद पाटील, निलेश वाघ आणि जगन्नाथ पाटील यांनी संयुक्तपणे ही यशस्वी कारवाई केली.



