मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत नव्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली होती आणि निर्णयाच्या दिशेने हालचाल झाली होती. मात्र सध्या हा विषय आम्ही बंद केला आहे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. “आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो आहोत, असे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्याकडून कोणतीही गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर त्यांची इच्छा काय होती याबाबत आम्ही सत्य सांगितले. मात्र त्यानंतर या विषयावर आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही,” असे शिंदे म्हणाले. दादांची इच्छा पूर्ण करण्याबाबत आम्ही भूमिका मांडली होती, पण आता या विषयावर अधिक बोलायचे नाही, असा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, विलीनीकरणाला काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी सावध भूमिका घेतली. “या विषयावर मी काही बोलणार नाही. त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही आता पुन्हा जोमाने काम करून पक्ष उभा करण्यावर भर देत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
विलीनीकरणानंतर एनडीएसोबत जाणार का किंवा अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार होते का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, “जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर याबाबत निर्णय होणार होता. त्यांच्या मनात काय होते किंवा माझ्या मनात काय होते हे आता सांगणे योग्य नाही. एनडीएसोबत पुढे जायचे की नाही हा निर्णय संबंधित नेतृत्वाचा असेल. आता तो अधिकार सुनेत्रा वहिनींचा आहे.” या विधानामुळे आगामी राजकीय दिशा काय असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीमुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शशिकांत शिंदे यांच्या ताज्या वक्तव्यानंतर विलीनीकरणाचा मुद्दा सध्या तरी बाजूला ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही गट स्वतंत्रपणे आपापली ताकद वाढवण्यावर भर देतील, असे संकेत मिळत आहेत.



