जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात वाढत्या लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या द्रुतगतीने विकसित होत असलेल्या भागासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा उभी करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
सी. एस. नं. ३३६२, सी. योगेश्वर नगर, जळगाव येथील रहिवासी मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कालिका माता मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग झपाट्याने विस्तारत असून येथे योगेश्वर नगर, जुने जळगाव, खेडी बुद्रुक, तळेले कॉलनी, शंकरराव नगर, तुळसाई नगर, प्रेमचंद नगर, मुरलीधर नगर, ज्ञानदेव नगर, गीताई नगर, काशिनाथ नगर, जमुना नगर, दशरथ नगर, शिवसाई कॉलनी, श्रावण नगर, सुंदर नगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, सुनील नगर, मनुमता नगर, गजानन पार्क, विठोबा नगर, बाबुराव नगर, सरस्वती नगर, द्वारका नगर, सागर नगर, गोविंद नगर, शंभू नगर, मेस्कोमाता नगर, दिनकर नगर, तानाजी मालुसरे परिसर, श्रीराम कॉलनी, श्री तिरुपती बालाजी कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, कुंभार वाडा, वाल्मीक नगर, दगडी चाळ, जय गजानन नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गोपाळपुरा, ४ बत्ती परिसर, भगवान नगर, विनायक नगर, माऊली नगर, शिव नगर, सुदर्शन कॉलनी, पाटील वाडा, इंदिरा नगर, कोळी पेठ, चांभार वाडा, खाटकी वाडा, भोई वाडा, राम पेठ, मारुती पेठ, वृंदावन कॉलनी, सदोबा नगर, लक्ष्मणभाऊ नगर आदी भागांचा समावेश होतो. या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रहिवासी वास्तव्यास असून लोकसंख्या सुमारे ५० हजारांच्या आसपास पोहोचली आहे.

हा संपूर्ण परिसर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, या विस्तीर्ण भागाची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सध्या एमआयडीसी पोलिस ठाणे आणि शनिपेठ पोलिस ठाणे यांच्यात विभागली गेली आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यास हद्दीच्या वादावरून गुन्हा दाखल करण्यास आणि तपास सुरू करण्यास विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या भागात प्रामुख्याने श्रमजीवी, शेतकरी, कष्टकरी आणि मजुरी करणारे कामगार वास्तव्यास आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत येथे हाणामाऱ्या, चोरी, दरोडे, महिलांची छेडछाड, वाहन अपघात तसेच अवैध धंद्यांच्या घटनांत वाढ झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या परिसरात खुनाच्या घटना घडल्या असून दिवसा ढवळ्या स्टेट बँकेवर दरोडा पडल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन झाल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, तक्रारींवर तत्काळ कारवाई होईल आणि परिसरात पोलिस गस्त वाढेल. तसेच महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कालिका माता मंदिर परिसरात स्वतंत्र पोलिस ठाणे उभारावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



