पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून खोकला आणि कफाच्या त्रासामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे.
खोकला आणि छातीत संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. मागील पाच ते सहा दिवस त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. छातीत संसर्ग आढळल्यानंतर त्यांच्यावर प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) उपचार करण्यात आले. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आणि आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, “शरद पवार यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली आहे. ते पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र पुढील काही दिवस त्यांनी विश्रांती घेणे आवश्यक आहे.” डॉक्टरांनी त्यांना किमान तीन ते चार दिवस संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्यानंतर ते हलका प्रवास करू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
डिस्चार्जनंतर पवार यांना घरी नेण्यासाठी त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे रुग्णालयात उपस्थित होत्या. रुग्णालयातून खाली आल्यानंतर व्हीलचेअरवरून त्यांनी उपस्थितांना हात दाखवत अभिवादन केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात आले. घरच्या घरी पुढील चार ते पाच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दरम्यान, पवार हे बारामती येथील त्यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी असताना त्यांना अचानक खोकला आणि कफाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर डॉक्टरांचे पथक घरी जाऊन प्राथमिक तपासणी करून आले. प्रकृती लक्षात घेता त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. योग्य वेळी उपचार सुरू झाल्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.



