मुंबई-वृत्तसेवा । राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर आज सकाळपासून संपर्काबाहेर असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक झाल्यानंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली असून, त्यानंतर ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याने या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी ३५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून ढेरिंगे याला रंगेहात पकडले.

या घटनेनंतर मंत्रालयातच लाचखोरी उघड झाल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या लिपिकाने ही लाच मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या सूचनेनुसार घेतल्याचा दावा केल्याने तपासाची दिशा आता मंत्र्यांच्या कार्यालयाकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मोबाईल फोन सकाळपासून लागत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आज कोणतीही अधिकृत बैठक घेतली नसून ते कुठे आहेत याबाबतही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्यामुळे एसीबीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते संपर्काबाहेर गेल्याने विविध शंकांना वाव मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “माझा या लाचखोरीशी काहीही संबंध नाही. मात्र, तपासात माझा संबंध सिद्ध झाला तर मी १०० टक्के राजीनामा देईन,” अशी भूमिका मांडली आहे.
या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी या कारवाईमागे राजकीय हेतू असू शकतो, असा आरोप केला. “सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात टक्केवारीचे सरकार सुरू असून मंत्रालयातही भ्रष्टाचार उघड झाला आहे,” अशी टीका त्यांनी केली.
मंत्र्यांच्या कार्यालयातील लाचखोरी, त्यानंतर झालेली अटक आणि मंत्री स्वतः संपर्काबाहेर असल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. आता एसीबीच्या तपासात नेमके कोणाचे नाव समोर येते आणि या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



