जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील १० विद्यार्थ्यांची नामांकित औद्योगिक समूह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यशस्वी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक ₹७.५ लाख इतके आकर्षक वेतन पॅकेज मिळाले असून महाविद्यालयात त्यांचे विशेष अभिनंद करण्यात आले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील पियुष सोनगिरे, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील कुणाल घोरपडे, गणेश वरखडे व शिवम शलेशा, तसेच इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागातील मोहित कासार, कुणाल पाटील, आशुतोष पवार, मोहम्मद उसामा सांगळे, मेघराज होरे आणि उदय हरखळ यांचा समावेश आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गाजरे, डॉ. जी. एन. माळवटकर तसेच प्रशिक्षण व नियुक्ती विभागप्रमुख डॉ. एम. एस. सदावर्ते यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी असून देश-विदेशात विस्तृत उद्योगजाळे असलेल्या या कंपनीत नोकरीची संधी मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी मोठे यश मानले जाते. या यशामुळे महाविद्यालयाची प्लेसमेंट परंपरा अधिक बळकट झाली असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.



