Home क्राईम रिक्षात बसवून प्रवाशांचे पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

रिक्षात बसवून प्रवाशांचे पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एमआयडीसी पोलीसांची कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौफुली परिसरात प्रवाशांना रिक्षात बसवून त्यांच्या खिशातील रोकड लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेत पोलिसांनी संशयित सराईत चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेली २५ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे भुसावळला जाण्यासाठी अजिंठा चौफुलीवर रिक्षाची वाट पाहत होते. यावेळी एका रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी आधीच बसलेले होते. चालकाने फिर्यादी यांना विश्वासात घेऊन रिक्षात मागे बसलेल्या दोन पुरुषांच्या मध्यभागी बसण्यास सांगितले. रिक्षा अजिंठा चौफुलीकडून कालिका माता मंदिराकडे जात असताना, चालकाने आणि त्याच्या साथीदारांनी हातचलाकीने प्रवाशाच्या पँटच्या खिशातील २५ हजारांची रोख काढून घेतले. यानंतर टाटा शोरूमसमोर त्यांना उतरवून आरोपी रिक्षासह पसार झाले.

फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाची टीम तयार केली. पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.कॉ. नितीन ठाकूर, पोकॉ. किरण पाटील, पो.कॉ. गणेश ठाकरे, पो.कॉ. राहूल घेटे या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न उर्फ बंटी नंदू महाले (वय २८) आणि गौरव उर्फ राज कैलास पाटील (वय १८, दोघे रा. खंडेराव नगर, जळगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेली संपूर्ण २५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक महाजन हे करत आहेत.


Protected Content

Play sound