जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या २६ वर्षांची परंपरा जपत ‘सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती’च्या वतीने जळगावात यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी निघणारी भव्य पारंपरिक शोभायात्रा, महिलांची स्कूटर रॅली तसेच विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरात शिवमय वातावरण निर्माण होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यंदाचा सांस्कृतिक सप्ताह रद्द करण्यात आला असला, तरी मुख्य शोभायात्रा नेहमीप्रमाणे भव्य स्वरूपात होणार असल्याची माहिती वस्त्रउद्योग मंत्री तथा समितीचे अध्यक्ष ना. संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे, यंदाची शोभायात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. यावेळी समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महिलांच्या भव्य स्कूटर रॅलीने होणार आहे. महापौर दीपमाला काळे आणि जिजाऊंच्या लीना पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहापासून या रॅलीला प्रारंभ होईल. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून शोभायात्रेला सुरुवात होईल. नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे ही यात्रा शिवतीर्थावरील शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचेल. यंदाच्या शोभायात्रेत गुलाल आणि डीजेचा वापर पूर्णपणे टाळण्यात येणार असून पारंपरिक वाद्ये, लेझीम पथके, घोडे, शोभा रथ आणि जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. शहरातील शाळा व महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भाऊंच्या उद्यानात रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाशेजारील मैदानावर ‘किल्ले बनवा’ स्पर्धा होणार आहे. नवीन पिढीपर्यंत शिवरायांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व पोहोचवणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
शिवजयंती दिनी सायंकाळी संभाजी राजे नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जोशपूर्ण पोवाड्यांचा कार्यक्रम रंगणार आहे. समितीच्या वतीने शिवजयंतीसोबतच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी राजे जयंती तसेच ६ जूनचा राज्याभिषेक दिनही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याच अनुषंगाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.



