
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन एनएसई मर्चंट टास्क पुर्ण करण्याचे सांगून एका महिलेचा विश्वास संपादन करून सुमारे साडे आठ लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पारोळा शहरातील एका भागात ३२ वर्षीय महिला ह्या वास्तव्याला आहेत. खासगी नोकरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. ८ जानेवारी ते १२ जानेवारी च्या कालावधीत त्यांना त्यांच्या व्हॉटस्ॲप मोबाईल क्रमांकावर एनएसई मधील एचआर असल्याचे सांगून एका अनोळखी महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना टेलीग्राम ॲडव्हायझर ऐंजलिया व तिचे सोबतचे इतर सहकारी असल्याचे भासवून त्यांना एनएसईचे वेगवेगळे टास्क पुर्ण करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर टेलीग्राम टास्क पुर्ण करण्यासाठी त्यांना पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार पाचोरा येथील महिलेने वेगवेगळ्या पद्ध्तीने एकुण ८ लाख ५० हजार ८०० रूपये ऑनलाईन भरले. त्यानंतर त्यांना कोणतीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करीत आहे.



