Home राजकीय एस.टी. प्रवास पूर्णपणे डिजिटल; सामाजिक सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य

एस.टी. प्रवास पूर्णपणे डिजिटल; सामाजिक सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य


मुंबई-वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एस.टी.च्या प्रवासात आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्यात येणार असून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या निर्णयामुळे एस.टी.चा प्रवास अधिक आधुनिक आणि डिजिटल होणार आहे. रोखविरहित व्यवहारांना चालना मिळणार असून शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींची प्रतिपूर्ती अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे. या योजनेसाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एन.एस.डी.एल. पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. लवकरच राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू केली जाणार आहे.

या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. अमृत ज्येष्ठ, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आधार संलग्न कार्ड देण्यात येणार आहे. दिव्यांग प्रवाशांना युडीआयडी क्रमांकाच्या आधारे विशेष सुविधा असलेले कार्ड मिळणार आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विभागीय कार्यालयामार्फत कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे.

एनसीएमसी कार्डसाठी नवीन अर्जदारांना १९९ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मात्र ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे त्यांनी ते जमा केल्यास केवळ १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळणार आहे. कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक असून ५० रुपयांच्या पटीत ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून रिचार्ज करता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

“ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. तिकीट काढताना सुट्या पैशांची चिंता आता संपणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


Protected Content

Play sound