जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराचा नैसर्गिक वारसा असलेल्या मेहरुण तलावात थेट गटारीचे सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने दखल घेत सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांनी तलावातील वाढत्या दुर्गंधीबाबत आणि दूषित पाण्यामुळे जलचरांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी केल्या होत्या, ज्याची दखल घेत महापौरांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली.
पाहणी दरम्यान सांडपाणी थेट तलावाच्या पात्रात जात असल्याचे स्पष्ट झाल्याने महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेची कडक शब्दांत कानउघडणी केली.

तलावाचे प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची हानी नसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौरांनी शहर अभियंता योगेश बोरोले यांना तातडीने आदेश दिले असून, पुढील २१ दिवसांच्या आत सांडपाण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी पर्यायी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत.
मेहरुण तलावाची जैवविविधता आणि सौंदर्य टिकवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, महापौरांनी या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे.



