मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा अक्षरशः धडाका उडाला असून, उपमुख्यमंत्री अजितदादांनी मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याने राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
आज 10 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारल्यानंतर थेट मंत्रिमंडळ बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आवश्यक भूमी अधिग्रहणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या भूमी अधिग्रहणासाठी लागणाऱ्या निधी उभारणीसही मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी सुमारे 96 टक्के जमीनधारकांनी स्वेच्छेने जमीन देण्यास संमती दर्शवली आहे.

राज्याच्या शहरी विकासाला चालना देणारा आणखी एक महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. एमएमआरडीएला अटल सेतू परिसरात प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून देण्यात आलेल्या जागेवर सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू करून जमीन अधिग्रहण करता येणार आहे. या निर्णयामुळे ‘तिसरी मुंबई’ संकल्पनेला गती मिळणार असून, भविष्यातील नागरी विस्ताराला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जलसंपदा विभागासाठीही अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतण्यात आला आहे. राज्यातील 40 सिंचन प्रकल्प आणि 100 कालवे पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचे दीर्घमुदतीचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे सर्व प्रकल्प पुढील एक ते दोन वर्षांत पूर्ण होणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेती उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बैठकीत अजितदादांच्या तीन प्रमुख मागण्यांनाही मान्यता देण्यात आली. बारामती येथे 75 कोटी रुपयांचे भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच वालचंदनगर–रत्नापूर एमआयडीसीसाठी 1000 एकर जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवंगत अजितदादा पवार यांचे तैलचित्र विधिमंडळ परिसरात लावण्याची मागणी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विधिमंडळ परिसरात अजितदादांचे तैलचित्र लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.



