
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महानाईक जयंतीचे औचित्य साधून जळगाव येथे आज सामाजिक प्रबोधन, महिला सशक्तीकरण आणि बहुजन विचारधारेचा जागर करणारे भव्य जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन उत्साहात पार पडले. विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला असून, विचारमंथनातून सामाजिक बदलाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा तसेच सर्व महिला विंग यांच्या संयुक्त विद्यमाने महानाईक जयंती महोत्सवानिमित्त हे संमेलन अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यकर्त्या आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
संमेलनाचे उद्घाटन माया बारी, राष्ट्रीय अध्यक्षा, सकल बारी समाज आणि संध्या गवई, राज्य कार्याध्यक्ष, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर आणि फातिमा बी शेख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या महामानव महिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संध्या गवई होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून तृप्ता महाजन, वैशाली पाटील, डॉ. उषा सपकाळे, डॉ. माधुरी तायडे, दिपाली तायडे, बेबाबाई सोनवणे, हसिना तडवी, रेखाताई इंगळे, वंदना धनराज कोळी, यशोदाताई तायडे, ताईबाई भालेराव आणि रेखाताई सुरडकर यांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या मान्यवर महिलांनी सामाजिक समतेसाठी सुरू असलेल्या लढ्याचा आढावा मांडला.
प्रबोधन संमेलनात वक्त्या म्हणून विशाखा पाटील, रेखा देशमुख, मिला पाटोकर, रिंकीता यादव, मनिषा गांधेले, साक्षी खरे, कुसुमताई गायकवाड, प्रा. मनिषा संदीप देशमुख, प्रा. मिनाक्षी कांबळे, जयश्रीताई इंगळे, अंकिता गजरे, सुरेखा तायडे, फर्जना बी शेख जमील, जेबा परविन शकीर शेख आदींनी विचार मांडले. महिलांवरील अन्याय-अत्याचार, शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि घटनात्मक हक्क यावर त्यांनी सखोल भाष्य केले.
संमेलनादरम्यान महिलांमध्ये संघटनबांधणी, बंधुता आणि वैचारिक एकजूट वाढविण्याचा संदेश देण्यात आला. बहुजन चळवळीतील महिलांची भूमिका अधिक भक्कम करण्यासाठी अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांची गरज असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संघटनांनी उपस्थितांचे आभार मानले.



