जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाजन आर्ट, महाजन परिवार आणि कांचन नगरमधील स्थानिक भाविकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आज भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. “गण गण गणात बोते” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पहा याचा वृत्तांत…
या सोहळ्याची सुरुवात ‘महाजन आर्ट’च्या गोडावूनपासून झाली. प्रारंभी श्रींच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले, त्यानंतर वाजत-गाजत ही पालखी कांचन नगर परिसरातून काढण्यात आली. “गण गण गणात बोते” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीमध्ये अबालवृद्धांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालखी सोहळ्यानंतर गजानन महाराजांचा प्रिय प्रसाद मानल्या जाणाऱ्या ‘बेसन-भाकरी’चे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

विशेष म्हणजे, महाजन परिवार गेल्या २५ वर्षांपासून गजानन महाराजांची अनन्यसाधारण भक्ती करत असून, ही परंपरा त्यांनी आजही तितक्याच श्रद्धेने जोपासली आहे. “महाराजांच्या कृपेने दरवर्षी हा सोहळा अधिक व्यापक होत आहे,” अशी भावना महाजन परिवारातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमासाठी कांचन नगरमधील सर्व भाविकांनी मोलाचे सहकार्य केले, ज्यामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.



