Home Cities जळगाव जळगावात ‘शिव महापुराण’ कथेने भक्तीचा महापूर; इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची अलोट गर्दी

जळगावात ‘शिव महापुराण’ कथेने भक्तीचा महापूर; इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची अलोट गर्दी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात संत श्री गजानन महाराज प्रकट दिनोत्सवानिमित्त भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून विविध धार्मिक उपक्रमांमुळे जळगाव अध्यात्ममय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंद्रप्रस्थ नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिव महापुराण’ कथेने भाविकांच्या मनावर गूढ आणि भक्तीची खोल छाप उमटवली असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक या कथेला उपस्थित राहत आहेत.

इंद्रप्रस्थ नगर येथे विशेष कार्यक्रमांतर्गत ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज यांच्या अमृतवाणीतून ‘शिव महापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, ६ फेब्रुवारी रोजी कथेच्या पुष्पामध्ये महाराजांनी भगवान शिवाच्या चरित्रातील गूढ रहस्ये, त्याग, तपस्या आणि कल्याणतत्त्व यांचे सखोल विवेचन केले. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला असून, कथेचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

कथानिरूपण करताना देवदत्त मोरदे महाराज यांनी सांगितले की, शिव महापुराण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून मानवी जीवनातील दुःख, क्लेश आणि अस्थिरता दूर करून अंतःकरणात शांती प्रस्थापित करणारा आध्यात्मिक मार्ग आहे. जसे संत श्री गजानन महाराजांनी ‘गण गण गणात बोते’ या मंत्रातून चराचरात परमेश्वर पाहण्याची शिकवण दिली, तसेच भगवान शिव हे त्या चराचराचे मूळ असून ते सर्वत्र व्यापून आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

भक्तीच्या मार्गावर चालताना ‘स्व’चा त्याग होणे अत्यंत आवश्यक असून, त्यातूनच शिवतत्त्वाची खरी अनुभूती प्राप्त होते, असेही महाराजांनी नमूद केले. शिव हे विनाशाचे नव्हे, तर कल्याणाचे, समतोलाचे आणि करुणेचे प्रतीक आहेत, असा संदेश त्यांनी भाविकांना दिला. या कथेमुळे अनेक भाविकांना अध्यात्मिक शांती आणि प्रेरणा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या आध्यात्मिक सोहळ्याचे नियोजन उत्सव समितीने अतिशय शिस्तबद्ध आणि भाविकांना सोयीचे होईल अशा पद्धतीने केले आहे. संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव गणेश शेळके आणि उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी भाविकांच्या सुविधा, आसनव्यवस्था आणि इतर नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडत आहे.

यावेळी समितीचे सदस्य योगेंद्र पवार, राजेंद्र डी. बडगुजर, सतीश वाणी, प्रकाश शेवाळे, डॉ. सोपान पाटील आणि सतीश भोसले यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांच्या संगमातून सुरू असलेल्या या ‘शिव महापुराण’ कथेने संपूर्ण इंद्रप्रस्थ नगर शिवमय झाले असून, जळगावच्या धार्मिक जीवनात हा सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरत आहे.


Protected Content

Play sound