जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा शिवारात तापी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी ट्रॅक्टरसह पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धानोरा (ता. जळगाव) येथील तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच वाळू माफियाने स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर वेगाने पळवून नेला. पोलिसांनी घटनास्थळावरून वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी किणी मशीन आणि सुमारे १ ब्रास गौण खनिज अर्थात वाळू असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी निंबा संतोष धनगर (रा. धानोरा, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब माळी करत आहेत. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.




