पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते जळगाव महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ ५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरचे तरुण हे नाचणखेडा ता. पाचोरा येथे हळदीच्या कार्यक्रमाला आले होते.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील एका गावात कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास पाचोरा–जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ हा अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला असावा आणि त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कार दोन ते तीन वेळा पलटी झाली व वाहनाचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला. या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील (वय – २७ वर्ष) रा. पिंप्राळा, जळगाव व प्रसन्न रवींद्र निमजे (वय – २१ वर्ष) रा. पिंप्राळा, जळगाव या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मयत झालेल्या श्रीरंग पाटील यांचे दोन महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. त्यांचे पाश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन विवाहित बहिणी असा परिवार असुन श्रीरंग हे पाटील परिवाराचा एकुलता मुलगा होता. त्यांचे वडिलांचे देखील काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
या अपघातात रोहित सोनार (वय – २३ वर्ष) हा तरुण गंभीर जखमी असलेल्या त्यास जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. निखिल कच्छवा (वय – २५ वर्ष), अनिकेत कोळी (वय – २२ वर्ष), निलेश वाघ (वय – २३ वर्ष) सर्व रा. पिंप्राळा, जळगाव हे जखमी असुन त्यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गाडीचा दरवाजा अडकून बसल्याने रुग्णवाहिका चालकांनी कारचा पत्रा तोडून मृतदेह बाहेर काढले. अपघातानंतर कारचे रेडिएटर अत्यंत गरम झाल्याने गाडीला आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत गाडीवर पाणी टाकून संभाव्य आग टाळली.
अपघातातील जखमींना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. सागर गरुड यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ उपचार सुरू केल्याने काही जखमींचे प्राण वाचले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, भागवत पाटील, गोलू पाटील आणि किशोर लोहार यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी गजानन जोशी, दिलीप पाटील, दिलीप वाघमोडे, अशोक पाटील, वाशिम शेख व गजानन देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
सरात शोककळा पसरली आहे. **



