Home Cities जळगाव जळगावच्या महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी विराजमान !

जळगावच्या महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी विराजमान !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची आज अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. यात भाजपला सर्वाधीक 46, शिवसेनेला 22, राष्ट्रवादीला एक तर शिवसेना-उबाठाला पाच जागा मिळाल्या होत्या. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली होती. यानंतर महापौरपदासाठी भाजपच्या वतीने दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या वतीने मनोज चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी आपापले अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज सादर न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड आधीच निश्चीत झाली होती. आजच्या विशेष सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या या सभेला आयुक्त, उपायुक्त तसेच महापालिकेचे अधिकारी आणि नवनिर्वाचीत नगरसेवकांची उपस्थिती होती. महायुतीचे सर्व नगरसेवक भगवे फेटे धारण करून सभागृहात दाखल झाले होत्ो. तर या ऐतीहासीक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी देखील सभागृहात उपस्थित होते.

प्रारंभी सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महापौरपदावर दीपमाला काळे यांच्या नावाची घोषणा केली. याप्रसंगी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा सत्कार करण्यात आला. तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. अतिशय चैतन्यदायी वातावरणात महापौर आणि उपमहापौरपदाची निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर झाल्यानंतर उपस्थितांनी महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार केला.

दरम्यान, महापौर आणि उपमहापौरपदाची निवड जाहीर होताच महापालिकेच्या आवारात महायुतीच्या समर्थकांनी जोरदार आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.


Protected Content

Play sound