Home Cities जळगाव लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू ; जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू ; जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध प्रशासकीय व वैयक्तिक समस्यांचे वेळेत निवारण व्हावे, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या प्रक्रियेत नागरिकांना अधिक सुलभता मिळावी तसेच त्यांचा वेळ, प्रवासाचा खर्च व श्रम वाचावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने लोकशाही दिनासाठी अर्ज नोंदणीची ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे.

या नव्या सुविधेमुळे आता नागरिकांना लोकशाही दिनासाठी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अधिकृत Jalgaon.gov.in या संकेतस्थळावरून नागरिक घरबसल्या आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकणार आहेत, ज्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दर महिन्याच्या ०१ तारखेपासून १५ तारखेपर्यंत खुली राहणार आहे. या कालावधीत प्राप्त होणारे सर्व अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जातील. त्यानंतर संबंधित विभागांकडून या अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढील लोकशाही दिनात घेण्यात येणार आहे.

या प्रणालीमुळे अर्जांची नोंद, वर्गवारी व पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करता येणार असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. विशेषतः लांबच्या तालुक्यांतून जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी होणारा वेळ आणि खर्च टाळता येणार असल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांना या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येण्याऐवजी या ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. लोकशाही दिन अधिक लोकाभिमुख व सुलभ करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound