Home क्राईम भरधाव कारने दुचाकीला उडवले ; पती-पत्नी गंभीर जखमी !

भरधाव कारने दुचाकीला उडवले ; पती-पत्नी गंभीर जखमी !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अपघातांचे सत्र सुरूच असून, टीव्हीएस शोरूमजवळ एका भरधाव अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवर स्वार असलेले पती-पत्नी जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आशा भीमराव गोसावी (वय ४५, रा. साईबाबा मंदिराजवळ, जळगाव) या मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास पतीसोबत दुचाकीने (क्रमांक एमएच १९ बीई ७०५७) घरी जात होत्या. सिंधी कॉलनीकडून घरी परतत असताना टीव्हीएस शोरूमजवळील रस्त्यावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात आशा गोसावी यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना दोन टाके पडले आहेत. तसेच त्यांच्या छातीस, नाकास आणि कपाळावरही जखमा झाल्या असून कपाळावर दोन टाके टाकावे लागले आहेत. त्यांचे पती देखील या घटनेत जखमी झाले असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर कार चालक जखमींना कोणतीही मदत न करता अजिंठा चौफुलीच्या दिशेने वेगाने पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound