मुंबई (वृत्तसंस्था) भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील संशयित आरोपी आणि माओवादी विचारवंत गौतम नवलखा यांचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’शी थेट संबंध आहे, असा खळबळजनक आरोप राज्य सरकारच्या वकील अरुणा पै यांनी बुधवारी मुंबई हायकोर्टात केला आहे.
अरुणा यांनी पुणे पोलिसांच्या चार्जशीटच्या आधारे कोर्टात सांगितले की, गौतम नवलखा हे सन 2011 ते 2014 दरम्यान काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी आणि शकील बख्शी यांच्या संपर्कात होते. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी, पोलिसांनी नवलखाची सुटका न करण्याची विनंती त्यांनी हायकोर्टात केली. न्यायालयाने पुढील निर्णयापर्यंत नवलखाचा तुरुंगवास वाढवत त्याला सुरक्षा देण्यास सांगितले आहे. दरम्यान, संशयित नवलखा यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल करुन त्याच्यावर दाखल झालेली प्रकरणे हटवण्याची अपील केली. हायकोर्टाने यावर राज्य सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.