Home क्राईम नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा ; चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा ; चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस दल आणि वनविभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन तरुणांना तब्बल ६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी घनश्याम कैलास पाटील (वय ३०, रा. हिंगोणे खुर्द, ता. चाळीसगाव) हे मोबाईल शॉप चालवून आपला उदरनिर्वाह करतात. संशयित आरोपी कुणाल भगवान डांगर (रा. छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम टाकळी प्र.चा.) याने फिर्यादी घनश्याम पाटील, दीपक गोपीचंद चव्हाण आणि हर्षल दिलीप चव्हाण या तिघांना विश्वासात घेतले. ‘माझी पोलीस खाते आणि वनविभागात चांगली ओळख असून, मी तुम्हाला तिथे नोकरी लावून देऊ शकतो’, असे आमिष त्याने दाखवले.

नोकरीच्या बदल्यात संशयित आरोपीने प्रत्येक तरुणाकडून २ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार तिघांनी मिळून एकूण ६ लाख रुपये आरोपीला दिले. ही रक्कम चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्समधील देवांश मोबाईल शॉपवर आणि बँक ऑफ इंडियाजवळ ७ जून ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत देण्यात आली. मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने आणि आरोपी टाळाटाळ करत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले.

अखेर घनश्याम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करत आहेत.


Protected Content

Play sound