जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रसूतीच्या वेदनांची भीती अनेक गर्भवती महिलांच्या मनात कायम असते. तीव्र वेदनांमुळे प्रसूतीचा काळ हा मानसिक तणावाचा ठरतो. मात्र आता जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक पेनलेस डिलीव्हरी (वेदनारहित प्रसूती) सुविधेमुळे ही भीती दूर होणार असून, मातांसाठी प्रसूतीचा अनुभव अधिक सुरक्षित व आरामदायी ठरणार आहे.
पेनलेस डिलीव्हरी ही आधुनिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित पद्धत असून, प्रसूतीच्या वेळी महिलांच्या पाठीच्या कण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन दिले जाते. यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या असह्य वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात किंवा पूर्णपणे थांबतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे महिलांना वेदनांमुळे त्रास न होता सुरक्षितपणे प्रसूती पार पाडता येते.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ही सुविधा अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ यांच्या समन्वयातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीदरम्यानची काळजी तसेच प्रसूतीनंतरचा उपचार हा सर्व काळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सततच्या निरीक्षणाखाली पार पाडला जातो. त्यामुळे सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.
तज्ज्ञांच्या मते, पेनलेस डिलीव्हरीमुळे महिलांचा मानसिक तणाव लक्षणीयरीत्या कमी होतो. वेदनांची भीती कमी झाल्याने प्रसूतीबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. अनेक वेळा वेदनांच्या भीतीमुळे सिझेरियन शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला जातो, मात्र पेनलेस डिलीव्हरीमुळे नॉर्मल डिलीव्हरीचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत होते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही आधुनिक सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबांनाही या उपचारांचा लाभ मिळावा, या सामाजिक जाणिवेतून रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण उपचार प्रक्रियेमध्ये आवश्यक तपासण्या, औषधोपचार तसेच डॉक्टरांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
रुग्णालयात २४ तास स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या, डॉ. पल्लवी आणि डॉ. प्राजक्ता यांची तज्ज्ञ टीम कार्यरत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध असून, गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र व सुसज्ज प्रसूती कक्ष, स्वच्छता, सुरक्षित वातावरण आणि नवजात बाळासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
आधुनिक वैद्यकीय युगात महिलांनी प्रसूतीच्या वेदना सहन कराव्यात, असे अजिबात नाही. पेनलेस डिलीव्हरी ही सुरक्षित आणि प्रभावी पद्धत असून, आई व बाळाच्या आरोग्यास कोणताही धोका नाही. सवलतीच्या दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यामागे सर्वसामान्य महिलांनाही आधुनिक आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, हाच उद्देश असल्याचे डॉ. ऐश्वर्या यांनी सांगितले. अधिकाधिक महिलांनी या सुविधेचा लाभ घेऊन सुरक्षित व आनंददायी मातृत्वाचा अनुभव घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.



