जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील श्री प्रभू विश्वकर्मा मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास दानपेटी फोडून रोख रक्कम चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरात शहरातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार , शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने विश्वकर्मा मंदिरात प्रवेश करून दानपेटीचे कुलूप तोडले. त्यानंतर दानपेटीत असलेली अंदाजे ४०० ते ५०० रुपयांची रक्कम चोरून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. सकाळी मंदिर परिसरात हालचाल सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

या घटनेबाबत मंदिराचे पुजारी विजय प्रल्हाद खराटे (वय ४२, रा. विश्वकर्मा मंदिर पुजारी रूम, मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची रक्कम मोठी नसली तरी धार्मिक स्थळात घडलेला हा प्रकार भाविकांच्या भावना दुखावणारा असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
घटनेचे साक्षीदार म्हणून भास्कर लक्ष्मण जंजाळकर (रा. वराडे कॉम्प्लेक्स मागे, मुक्ताईनगर) यांची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, हा चोरटा दानपेटी घेऊन जातांना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.



