
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नासिर रशीद खाटीक (वय ६३) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीच्या सायंकाळपासून ते ३ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत फिर्यादींचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील १४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि ५ हजार ५०० रुपये किमतीच्या चांदीच्या साखळ्या, असा एकूण १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ वीरेंद्र शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.



