
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील तामसवाडी परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने अचानक कारवाई करत विना नंबरची ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यांपासून अवैध खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवायांमध्ये ढिलाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील भोकर नदी पात्रातून तामसवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार महसूल पथकाने सापळा रचून कारवाई केली असता विना नंबरची ट्रॅक्टर-ट्रॉली अवैधरीत्या वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. तत्काळ कारवाई करत संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून महसूल पथकातील अश्विनी हांडे, आकाश तायडे, प्रशांत जाधव, अविनाश इंगोले, नागसिंग इंगळे, यासिन तडवी, रवी शिंगणे, कैलास चव्हाण व सचिन राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला. महसूल पथकाच्या या धडक कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोकर नदीलगतचा तामसवाडी परिसर हा अवैध गौण खनिज वाहतुकीचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. वाळू माफियांच्या बिनधास्त हालचालींमुळे नदीपात्रातून बेसुमार उत्खनन होत असून त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलत असल्याचे वास्तव समोर येत आहे. याचा थेट परिणाम शेती, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणावर होत असल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मागील पाच ते सहा महिन्यांपासून महसूल विभागाकडून होणाऱ्या कारवायांमध्ये सातत्य नसल्याने अवैध खनिज वाहतूक करणाऱ्यांचे मनोबल वाढले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रोहन घुगे व तहसीलदार संजय तायडे यांनी या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देऊन कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.



