
बारामती-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या धार्मिक विधींविषयी सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांचे पुढील कोणतेही विधी होणार नसल्याची स्पष्ट माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली असून, यामागील कारणही त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले आहे.

अजित पवार हे 28 जानेवारी रोजी बारामती येथे येत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत विमानाचा स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता.
निधनानंतर दुसऱ्याच दिवशी, 29 जानेवारीला बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर 30 जानेवारी रोजी त्यांचा अस्थी सावडण्याचा विधी पार पडला आणि त्याच दिवशी सोनगाव येथे कऱ्हा-नीरा नदीच्या संगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते.
सामान्यतः त्यानंतर दहावा किंवा तेरावा दिवस अशा धार्मिक विधींचे आयोजन अपेक्षित असते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी तिसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारीलाच पार पडल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. अस्थी विसर्जनाच्या वेळीच आवश्यक सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले असल्याने आता पुढे कोणताही विधी केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुटुंबीयांनी परंपरेनुसार आणि आपसी चर्चेतून हा निर्णय घेतल्याचेही श्रीनिवास पवार यांनी सांगितले. त्यामुळे दहाव्या किंवा तेराव्या दिवशी कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. या विषयावर अजित पवार यांच्या निकटवर्तीय कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतेही निवेदन दिलेले नाही.
दरम्यान, आज बारामतीच्या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या ‘सहयोग’ या निवासस्थानी सांत्वनपर भेटींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पवार कुटुंबीय सांत्वनपर भेटी स्वीकारणार असून, सकाळपासूनच विविध राजकीय नेते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी गर्दी काटेवाडी येथे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आला असून, पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील संभाव्य प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची उर्वरित मुदत असूनही पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण टर्मसाठी राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहितीही समोर येत आहे.



