छत्रपती संभाजीनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सन्मान निधीत लवकरच वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सध्या या योजनेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जात असून, आगामी काळात ही रक्कम वाढवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय महिलांना मोठा आधार मिळाला असून दर महिन्याला थेट बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन दीड वर्षांचा कालावधी उलटूनही निधीत वाढ न झाल्याने महिलांमध्ये उत्सुकता व अपेक्षा वाढल्या होत्या.

आता छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडली. लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही आणि या योजनेला कोणीही थांबवू शकत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी महिलांच्या सन्मान निधीत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. याआधीही त्यांनी एक-दोन वेळा २१०० रुपये देण्याचा शब्द दिला असून तो पूर्ण केला जाईल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
आपल्या भाषणात शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धृत करत सत्ता येते-जाते, पण जनतेचे प्रेम महत्त्वाचे असते, असे सांगितले. “मी दिलेला शब्द पाळणारा आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लखपती करणार आहोत. २१०० रुपये देण्याचा शब्द आम्ही पूर्ण करणारच,” असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच शेतकरी कर्जमाफीबाबतही योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले.
या घोषणेमुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच सन्मान निधीत वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सरकारकडून अधिकृत निर्णय कधी जाहीर होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



