यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे एका शेतकऱ्याविरुद्ध दाखल केलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा आणि त्यातील साक्षीदारांचे जबाब फिरवण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मिलिंद प्रभाकर चौधरी (वय ५८) रा. किनगाव ता. यावल यांच्यावर संशयित आरोपी रामचंद्र दाजीबा पाटील रा. किनगाव याने यापूर्वी एक गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २१ ते २५ जानेवारी दरम्यान, आरोपीने चौधरी यांच्या एका मित्राला फोन करून धमकी दिली की, “जर मला पैसे दिले नाहीत, तर माझे माणसे गुन्ह्यात तुझ्याविरुद्ध साक्ष देतील आणि तुला जेलमध्ये सडावे लागेल”. आरोपीने सुरुवातील २ लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर १ लाख २५ हजार रुपये देण्याचे ठरले. खंडणीची ही वारंवार मागणी आणि धमक्यांमुळे वैतागलेल्या चौधरी यांनी अखेर पोलिसात धाव घेतली. यावल पोलिसांनी खंडणी मागितल्याच्या कारणावरून रामचंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.




