Home क्राईम प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल मेहून येथील प्राचीन आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या प्रसादेश्वर शिवमंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रयत्नाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलिसांची ढिसाळ व संशयास्पद भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे गावकऱ्यांनी रंगेहात पकडूनही मुक्ताईनगर पोलीस स्टेशनकडून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चिंचोल मेहून येथील प्रसादेश्वर शिवमंदिरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्या एका वर्षाच्या कालावधीत दोन वेळा मंदिरातील तांब्याचे नाग आणि पितळी घंटे चोरीस गेल्याच्या घटना समोर आल्या असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही मंदिराच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे मंदिर परिसर कायमच असुरक्षित असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

आजच्या घटनेत चोरटे मोठ्या प्रमाणावर चोरी करण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांना पकडण्यात आले. पकडलेल्या संशयितांना तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, एवढा गंभीर प्रकार घडूनही पोलिसांनी गुन्हा नोंद न करणे ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून संशय निर्माण करणारी असल्याची चर्चा गावागावांत सुरू झाली आहे.

या प्रकरणात पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण ग्रामस्थांच्या संतापात भर घालणारे ठरले आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्ती नदीमध्ये काम करणारे मजूर असून ते केवळ दर्शनासाठी मंदिरात आले होते, असा दावा केला. मात्र, ग्रामस्थांनी हा दावा साफ फेटाळून लावत त्या परिसरात नदीच नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चोरट्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे.

घटनेनंतर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची उदासीन भूमिका असह्य असून, प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यासह संपूर्ण परिसरात पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही तासांत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound