अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशातील शेती जमिनीतील कार्बन पातळी कमी होत चालल्याने सुपीकतेबाबत चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर भूमी सुपोषण व संरक्षणासाठी चालवले जाणारे राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती अभियान यावर्षी 19 मार्च 2026 रोजी अमळनेरमधून प्रारंभ होणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला, जो भूमी मातेचा जन्मदिवस मानला जातो, अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे औपचारिक उद्घाटन श्री. केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धार्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांमध्ये भूमीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या अभियानात भूमिपूजन, भूमी सुपोषण प्रयोग, प्रशिक्षण कार्यशाळा, संगोष्ठ्या, जनजागृती शिबिरे आणि प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत. तसेच शहरातील नागरिकांसाठी जैविक आणि अजैविक कचऱ्याचे वर्गीकरण, जैविक खतनिर्मिती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. यामुळे शेतकरी रासायनिकमुक्त शेतीकडे वळतील व जमिनीसाठी संतुलित व्यवस्थापनाच्या उपाययोजना अवलंबतील, अशी अपेक्षा आहे.

पारंपरिक दाक्षिणात्य शैलीतील श्री मंगळग्रह मंदिरातील विश्वातील एकमेव श्री भूमी मातेच्या मूर्तीच्या समोर या अभियानाचे शुभारंभ होणार असून, देशभरातील शेतकरी आपापल्या शेतातील माती घेऊन येतील. या मातीचे पूजन केले जाईल आणि पूजन झालेली माती गावोगावी वितरित करून भूमी सुपोषणाची संकल्पना प्रोत्साहित केली जाईल. या माध्यमातून शेतकरी आणि सामाजिक संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट होईल, असे अभियान संयोजक डॉ. डिगंबर महाले यांनी सांगितले.
राष्ट्रीय संयोजक पद्मश्री कृषक सुभाषजी शर्मा, संयोजक नवलजी रघुवंशी व सहसंयोजक आलोकजी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान देशभरात एकसंध पद्धतीने राबवले जाईल. यामुळे केवळ कृषी क्षेत्रातीलच नव्हे तर पर्यावरण संरक्षणासाठीही महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतील.



