जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने, क्रीडा ध्वज फडकावून आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण परिसरात खेळाडूवृत्ती आणि स्पर्धात्मक ऊर्जा जाणवत होती.
या उद्घाटन सोहळ्यास गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सदस्य व हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉ. सिद्धेश्वर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी ग्रीन, ब्ल्यू, येल्लो आणि रेड हाऊसच्या वतीने रंगारंग नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह स्पोर्ट्स’ या संकल्पनेवर आधारित फॉर्मेशन डान्स सादर केला. यासोबत कराटे प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली. क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली असून विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळामध्ये सक्रिय सहभाग घेऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले. खेळामुळे शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले. शालेय जीवनात क्रीडा संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी, गोळाफेक, क्रिकेट, बुद्धिबळ आदी विविध स्पर्धांचे आयोजन प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक तसेच शिक्षकांनी परिश्रम घेतले.



