
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या द्वितीय वर्षातील ४० विद्यार्थ्यांनी कॉपर ट्रॅक इंडस्ट्री नाशिक येथे औद्योगिक भेट दौरा केला. या दौऱ्यादरम्यान महाविद्यालय आणि कॉपर ट्रॅक इंडस्ट्री यांच्यात औपचारिक सामंजस्य करार करण्यात आला, ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांना पीसीबी निर्मिती, कॉपर ट्रॅक डिझाइन तसेच विविध औद्योगिक प्रक्रियांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे.

औद्योगिक भेटीत विद्यार्थ्यांना कंपनीतील तज्ञांनी सर्किट डिझाईनपासून पीसीबी टेस्टिंगपर्यंतच्या प्रक्रियांचा सविस्तर अनुभव दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक नव्हे तर व्यावहारिक ज्ञान वृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. प्रा. आर. व्ही. पाटील आणि प्रा. एम. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा यशस्वी झाला.
सामंजस्य करारामुळे भविष्यात महाविद्यालय आणि कॉपर ट्रॅक इंडस्ट्री यांच्यात प्रशिक्षण कार्यशाळा, प्रकल्प आधारित सहकार्य आणि औद्योगिक अनुभव मिळवण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्राचार्य व्ही. एच. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्य वृद्धीसाठी आणि औद्योगिक सुसज्जतेसाठी या कराराचे महत्त्व अधोरेखित केले.



