जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव शहरात आज सकाळी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता खानदेश सेंट्रल बिग बाजार येथून ध्वज पूजन व शंखनाद करून रॅलीची विधिवत सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख चौकांतून मार्गक्रमण करत ही रॅली पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उत्साहात संपन्न झाली.
रॅलीच्या प्रारंभी ध्वज पूजन व शंखनादाने वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रात चौक व कोर्ट चौक येथे पोहोचली असता प्रत्येक ठिकाणी ध्वज पूजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीचे जंगी स्वागत केले. रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी घोषणांच्या माध्यमातून सहभाग नोंदविला.

गणेश कॉलनी मार्गे रॅली पिंप्राळा येथे पोहोचली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढण्यात आल्याने वाहतूक सुरळीत राहिली.
या रॅलीमध्ये प्रशांत जुवेकर, मनोज तिवारी, नगरसेविका दीपमाला काळे, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मनोज चौधरी, नगरसेवक कल्पेश सोनवणे, कैलास आप्पा सोनवणे, तिवारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते. विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.



