यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद अपघाती निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावल शहरात उद्या एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाने केले आहे. शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आपल्या लाडक्या नेत्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

अजितदादा पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रभावी आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. विकासाभिमुख दृष्टिकोन आणि प्रशासनातील सक्रिय भूमिकेमुळे त्यांचा मोठा जनाधार होता. त्यांच्या अकाली निधनाने यावलसह संपूर्ण खान्देशात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी यावल शहर पूर्णतः बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे यावल तालुका अध्यक्ष रितेष पाटील, जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, अॅड. देवकांत पाटील, यावल शहराध्यक्ष कदीर खान, जुगल श्रीनिवास पाटील, आकाश सतीश चोपडे, विलास वना भास्कर, विक्की संजय बाविस्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना दिले आहे. बंद काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
शहरातील व्यापारी, नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी या बंदला सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने श्रद्धांजली व्यक्त करावी, असे आवाहनही पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. अजितदादांच्या कार्याची आठवण जपत सामूहिक पद्धतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.



