Home Cities जळगाव काव्यरत्नावली चौकात अजितदादांना सामूहिक श्रद्धांजली, आठवणींना दिला उजाळा

काव्यरत्नावली चौकात अजितदादांना सामूहिक श्रद्धांजली, आठवणींना दिला उजाळा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरलेली असताना जळगाव शहरातील नागरिकांनीही जड अंतःकरणाने त्यांना आदरांजली वाहिली. शुक्रवारी दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी काव्यरत्नावली चौक येथे मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी फुले अर्पण करून, मेणबत्त्या प्रज्वलित करून आणि तीन मिनिटे स्तब्धता पाळून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या श्रद्धांजली सभेला विविध क्षेत्रातील नागरिक, युवक, ज्येष्ठ मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकात गंभीर आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत उभे राहत अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन केले. या वेळी परिसरात पूर्ण शांतता पसरली होती आणि वातावरणात दुःखाची जाणीव स्पष्टपणे जाणवत होती.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी अजितदादांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही नागरिकांनी त्यांच्या साधेपणाची, कामकाजातील तत्परतेची आणि जनसामान्यांशी असलेल्या जवळिकीची आठवण काढली. भावनिक वातावरणामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

“अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे” तसेच “जब तक सूरज चाँद रहेगा, दादा आपका नाम रहेगा” अशा घोषणा देत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. घोषणांमुळे परिसर दणाणून गेला, मात्र त्या घोषणांमध्येही एक वेदना आणि आदराची छटा जाणवत होती.

श्रद्धांजली कार्यक्रमातून जळगावकरांनी आपल्या नेत्याविषयी असलेले प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञता व्यक्त केली. अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.

या भावनिक श्रद्धांजली सभेद्वारे जळगाव शहराने स्व. अजितदादा पवार यांना एकत्रितपणे मानवंदना देत त्यांचे कार्य आणि स्मृती सदैव जपल्या जातील, असा संदेश दिला.


Protected Content

Play sound