Home राजकीय निकृष्ट ज्वारीमुळे रावेर तालुक्यात संताप; आ.अमोल जावळे यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी 

निकृष्ट ज्वारीमुळे रावेर तालुक्यात संताप; आ.अमोल जावळे यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी 


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रेशन दुकानांमधून वितरित केली जाणारी ज्वारी निकृष्ट दर्जाची आल्याचा प्रकार समोर आल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांना मिळणारी ज्वारी खाण्यायोग्य नसल्याने ती गुरांना टाकण्याची वेळ आल्याची तक्रार अनेकांनी व्यक्त केली असून या प्रकरणात याकडे आमदार अमोल जावळे यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहे.

सध्या तालुक्यात नियमित रेशन वितरण सुरू असताना अनेक दुकानांवर आलेली ज्वारी अत्यंत खराब गुणवत्तेची असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. धान्याचा रंग, वास आणि दर्जा निकृष्ट असल्याने ते वापरणे धोकादायक असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. शासनाकडून गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी मिळणारे धान्यच जर अशा प्रकारे निकृष्ट असेल, तर जनतेने नेमके कुणावर विश्वास ठेवायचा, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, रावेर येथील पुरवठा अधिकारी विवेक शिरेकर यांनी सांगितले की संबंधित ज्वारी कुऱ्हा येथील गोडाऊनमधून प्राप्त झाली असून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दोषी पुरवठादारांवर कारवाई होईल का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील नागरिकांनी रेशन धान्य साठवणूक गोडाऊनवर नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत योग्य दर्जाचे धान्य पोहोचते की नाही, याची शहानिशा करण्याची जबाबदारी पुरवठा विभागावर असून महिन्याला काही दुकानांना अचानक भेट देऊन तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. शासनाकडून पाठवले जाणारे धान्य खऱ्या अर्थाने गरजूंच्या पोटापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात आमदार अमोल जावळे यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना कठोर सूचना द्याव्यात आणि निकृष्ट धान्य पुरवठ्याची साखळी उघड करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound