जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील दीड वर्षीय चिमुकलीवर मेंदूज्वर या गंभीर आजारावर यशस्वी उपचार करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी तिचे प्राण वाचवण्यात मोठे यश मिळवले आहे. अचानक आलेले झटके आणि शरीराची हालचाल मंदावल्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र वेळेवर मिळालेल्या तज्ज्ञ वैद्यकीय उपचारांमुळे चिमुकली आता पूर्णपणे सुधारून घरी परतली आहे. Overcoming encephalitis: A one-and-a-half-year-old girl’s life was saved at Dr. Ulhas Patil Hospital.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील मनस्वी पाटील या चिमुकलीला तीव्र तापासह अचानक झटके येऊ लागले. झटक्यांनंतर तिच्या शरीराची हालचाल कमी झाली, प्रतिसाद मंदावला आणि बेशुद्धावस्थेसारखी स्थिती निर्माण झाली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार आणि तज्ज्ञांच्या टीमने तातडीने तपासण्या सुरू केल्या. चिमुकलीच्या प्रकृतीची तीव्रता लक्षात घेऊन पाठीतील द्रवाची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणीतून मेंदूची सखोल पाहणी करण्यात आली आणि मेंदूज्वराचे निदान झाले.

निदान होताच चिमुकलीला बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉक्टर, अनुभवी नर्सिंग स्टाफ आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने २४ तास निरीक्षणाखाली उपचार सुरू करण्यात आले. झटके थांबवण्यासाठी आवश्यक औषधोपचार, मेंदूतील सूज कमी करण्यासाठी उपचार, ताप नियंत्रण, द्रवपदार्थ व पोषण व्यवस्थापन अशा सर्वसमावेशक उपचारयोजनेची अंमलबजावणी करण्यात आली. सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख आणि वेळेवर उपचारांमुळे अवघ्या आठवडाभरात झटके नियंत्रणात आले. हळूहळू तिच्या शरीराची हालचाल सुधारली, शुद्धी परत येऊ लागली आणि प्रतिसाद पूर्ववत झाला.
उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व तपासण्या समाधानकारक आल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कुटुंबीयांनी डॉक्टर आणि संपूर्ण रुग्णालयीन टीमचे आभार मानले. या उपचार प्रक्रियेत डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अभिजीत अरमाळ, डॉ. निरज जगताप, भारती झोपे, हिरामण लांडगे यांच्यासह नर्सिंग स्टाफने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
याबाबत निवासी डॉक्टर डॉ. अभिजीत अरमाळ यांनी सांगितले की, मेंदूज्वर हा लहान मुलांसाठी अतिशय गंभीर आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. अचानक ताप, झटके किंवा शुद्धी कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी विलंब न करता तज्ज्ञ रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळी केलेल्या निदान आणि अतिदक्षता विभागातील उपचारांमुळेच चिमुकलीचे प्राण वाचवणे शक्य झाले.



